उद्योजकताकराविषयकपर्सनल वेल्थशेअर मार्केटस्वतःची डेव्हलोपमेंट

बँक चार्जेस बद्दल तुम्हाला माहीत आहे का ?

आपल्यापैकी प्रत्येकाचं बँकेत बचत खातं नक्कीच असेल, परंतु तुम्हाला याची कल्पना आहे का कि बचत खात्यासाठी मिळणाऱ्या विविध सेवा बँक मोफत देत नाही. त्यासाठी बँक तुम्हाला काही शुल्क आकारते (Bank Charges). आज आपण बँकेच्या विविध चार्जेसबद्दल जाणून घेऊया. बचत खात्याच्या विविध सेवांसाठी जी रक्कम आपल्या खात्यातून कापून घेतली जाते त्याबद्दल बरेचदा आपल्याला कल्पना नसते.

बँकेकडून आकारण्यात येणारे 13 चार्जेस खालील प्रमाणे आहेत,

१.आवश्यक रक्कम बचत खात्यात न ठेवणे (Minimum Balance)

जर तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये बँकेच्या नियमाप्रमाणे निश्चित केलेली कमीत कमी रक्कम (minimum balance) ठेऊ शकलात नाही, तर तुम्हाला त्यासाठी काही दंड भरावा लागतो, ही गोष्ट तर सर्वांनाच माहिती असेल.
सरकारी बँक आणि खाजगी बँक यातील दंडाच्या रकमेत फरक असू शकतो, परंतु दोन्ही बँका तुमच्याकडून दंड मात्र नक्कीच घेतील.
सामान्यपणे दंडाची रक्कम दीडशे ते साडे सातशे रुपयांपर्यंत असू शकते.

२. चेक किंवा कॅश कलेक्शन

अनेक बँका अशी सेवा देतात. तुम्हाला वेळ नसेल तर बँकेचा प्रतिनिधी कॅश किंवा चेक तुमच्या घरी येऊन घेऊन जातात आणि बँकेत जमा करतात. परंतु, या सेवेसाठी बँक काही शुल्क आकारते का, याबद्दल माहिती करून घ्या.
ही रक्कम सरकारी आणि खाजगी बँक यांच्यामध्ये वेगवेगळी आहे. तरीही या सेवेचा खर्च तुम्हाला शंभर रुपये पासून ते एक हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो.

३. डेबीट कार्ड

आजच्या परिस्थितीत आपल्यापैकी प्रत्येकाकडे डेबिट कार्ड नक्कीच असेल. या डेबिट कार्ड वर देखील बँक वार्षिक सेवा खर्च आकारते.
हा खर्च प्रत्येक बँकेनुसार बदलत जातो, तरीही सामान्यपणे तुम्हाला वर्षभर डेबिट कार्ड वापरण्यासाठी अंदाजे तीनशे ते आठशे रुपये एवढा सेवा कर नक्कीच द्यावा लागेल.

४. बँक स्टेटमेंट फी

तुम्ही नेटबँकिंगचा वापर करून संपूर्ण महिन्याभराचं बँक स्टेटमेंट पाहू शकता, पण जर तुम्हाला छापील बँक स्टेटमेंट पाहिजे असेल तर तुम्हाला बँकेत जाऊनच ते मिळवावं लागतं.
सामान्यपणे जर तुम्हाला बँकेतून छापील स्टेटमेंट मिळवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी फी द्यायला लागते.
ही फी प्रत्येक बँकेनुसार बदलली जाऊ शकते परंतु तरीही सामान्यपणे तुम्हाला 35 रुपये ते 75 रुपयांपर्यंत बँक स्टेटमेंट साठी फी खर्च करावी लागेल.
हा खर्च तुमच्या खात्यातून आपोआप कमी होईल त्यासाठी तुम्हाला खिशातून पैसे द्यायची गरज नाही.

५. एटीएम वापरण्याची शुल्क

आपल्या सर्वांना माहिती आहे की आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीला महिनाभरात इतर बँकेच्या एटीएमद्वारे केलेले तीन व्यवहार मोफत आहेत तर त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएम द्वारे केलेले 5 व्यवहार मोफत आहेत.
हे नियम काही विशिष्ट बँक खात्यांसाठी शिथिल करण्यात आलेले आहेत, अशा बँक खात्यांना एटीएम द्वारे केलेले दहा व्यवहार मोफत करण्यात आलेले आहेत परंतु लक्षात घ्या अशा खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ठेवलेले असतात.
जर तुमचे महिनाभरातील एटीएम द्वारे करायचे मोफत व्यवहार संपले तर त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला अंदाजे वीस ते पंचवीस रुपये एवढा खर्च येऊ शकतो.

६. चेक बाउंस दंड

उद्योजकांनो कोणालाही चेक द्यायच्या आधी आपल्या बँक खात्यामध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध आहे का याची खात्री करून घ्या कारण जर तुमच्या खात्यामध्ये पैसे नसताना तुम्ही कोणाला चेक दिलात तर त्यासाठी तुम्हाला भुर्दंड भरावा लागेल.
जर तुमचा चेक बाउन्स झाला तर त्यासाठी तुम्हाला अंदाजे दीडशे ते साडे तीनशे रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो.
त्यासोबतच ज्या व्यक्तीने असा चेक जमा केला आहे त्यालादेखील पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत दंड होतो.
हा दंड जरी कमी वाटत असला तरीही चेक बाउन्स होनं हा दंडनीय अपराध आहे. यासाठी तुमच्यावर फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.
Stop payment request म्हणजेच जर तुम्हाला चेक द्वारे होणारा व्यवहार रद्द करायचा असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला बँकेला शुल्क द्यावे लागते. हे शुल्क ५० ते १०० रुपये एवढे असू शकते. अनेक बँकेमध्ये जर हि सेवा इंटरनेट बँकिंग द्वारे वापरली तर शुल्क लागत नाही.

७. जास्तीच्या चेकबुकसाठी आकारले जाणारे शुल्क

सर्वसाधारणपणे कुठली बँक तुम्हाला मोफत चेकबुक केवळ 20 ते 25 पानांचे देते. परंतु जर तुम्हाला जास्तीचे चेकबुक लागणार असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला बँकेला फी द्यावी लागते.
जास्तीच्या चेक बुक साठी तुम्हाला अंदाजे पन्नास रुपये ते शंभर रुपयांपर्यंत द्यावी लागू शकते. हे शुल्क बँकेनुसार कमी जास्त असू शकते.

८. डेबिट कार्डचा आंतरराष्ट्रीय वापर

उद्योजकांनो लक्षात घ्या बँक तुम्हाला डेबिट कार्ड स्थानिक वापरासाठी म्हणजेच देशांतर्गत व्यवहारांच्या सुलभतेसाठी उपलब्ध करून देते. त्यामुळे जर तुम्ही देशात कुठेही डेबिट कार्ड च्या सहाय्याने व्यवहार केला, तर तुम्हाला त्यासाठी कुठलीही अधिकची फी द्यावी लागणार नाही.
परंतु, जर तुम्ही तुमचे डेबिट कार्ड आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यवहारासाठी वापरत असाल तर मात्र तुम्हाला त्यासाठी अधिकचे शुल्क द्यावे लागेल.

९. आरटीजीएस, आयएमपीएस सेवा

जर तुम्ही या सेवांचा वापर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून करत असाल तर या सेवांसाठी तुम्हाला कुठलाही अधिकचा खर्च बँकेला द्यावा लागणार नाही.
परंतु जर तुम्हाला या सुविधांचा वापर बँकेमधून करायचा असेल तर यासाठी बँक तुमच्याकडून काही शुल्क नक्की आकारेल.
या सेवेसाठी तुम्हाला अंदाजे तीन रुपये ते 25 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. हा खर्च बँकेनुसार बदलतो.

१०. ईमेल, एसएमएस अलर्ट

उद्योजकांनो प्रत्येक बँक तुम्हाला एसएमएस आणि ईमेल द्वारे तुमच्या व्यवहारांची माहिती तुम्हाला पाठवण्यासाठी शुल्क आकारते.
हे शुल्क देखील बँकेनुसार बदलत जाते, सर्वसामान्यपणे ईमेल आणि एसेमेस सेवेसाठी बँक तुमच्याकडून वार्षिक ५० ते २०० रुपयांपर्यंत शुल्क आकारू शकते.
अशाप्रकारचे शुल्क टाळण्यासाठी अनावश्यक बँक स्टेटमेंट घेऊ नका, व्यवहारांची माहिती घेण्यासाठी शक्यतो इंटरनेट बँकिंगचा वापर करा.
जर काही कारणास्तव तुम्हाला बँक स्टेटमेंट हवे असेल तर इंटरनेट बँकिंगच्या मदतीने बँक स्टेटमेंटची प्रिंट काढून त्यावर बँकेचा शिक्का घ्यावा, शक्यतो अशा प्रकारच्या कामासाठी कुठलीही बँक शुल्क आकारात नाही.

११. रिवार्ड पॉईंट्स

आजकाल अनेक बँक्स तुमच्या इंटरनेट बँकिंग आणि डेबिट कार्डच्या होणार्या व्यवहारांवर तुम्हाला काही ठराविक रिवार्ड पॉईंट्स देतात.
या रिवार्ड पॉईंट्स साठी ग्राहक वरील माध्यमांमधून व्यवहार करत राहतो. पण जेव्हा हे रिवार्ड पॉईंट्स तुम्ही वापरायला जाता तेव्हा मात्र बँक त्या रिवार्ड पॉईंट्स वर देखील शुल्क आकारतात. हे साधारणतः रु. 99 इतके असते. अर्थात बँकेनुसार बदलू शकते.

१२. व्याज प्रमाणपत्र (Interest certificate)

वर्षातून एकदा या प्रमाणपत्राची आपल्याला गरज नक्कीच भासते.
आपण आपल गृहकर्ज वेळेवर परत करत आहोत हे दाखवण्यासाठी आपल्याला या प्रमाणपत्राची जास्त गरज भासते.
हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आपल्याला बँकेला 250 रुपयांचं शुल्क द्यावे लागते.

१३. इतर शुल्क

वरील सेवांप्रमाणेच बँक बचत खाते बंद करण्यासाठी आणि बचत खाते दुसऱ्या शाखेत हस्तांतरित करण्यासाठी देखील शुल्क आकारते.
बचत खाते कमी कालावधीमध्ये बंद करण्यासाठी (1 महिन्यात किंवा वर्षभराच्या आत ) बँक तुमच्याकडून शुल्क आकारते.
बँक खाते कमी वेळेत बंद करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 500 रुपये एवढा शुल्क बँकेला द्यायला लागू शकते.
बचत खाते एका शाखेकडून दुसऱ्या शाखेकडे हस्तांतरित करण्यासाठी देखील बँक तुमच्याकडून शुल्क आकारते.

© Respective owner

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *