उद्योग मोटिवेशनउद्योजकता

हॉटेल मधील नोकरी ते यशस्वी उद्योजक प्रवास..!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

हॉटेल मधील नोकरी ते यशस्वी उद्योजक प्रवास – ‘आपल्याकडे काय नाही आहे याचा विचार करीत कुढत बसू नका. उलट तुमच्याकडे काय आहे त्याचा पॉझिटिव्ह विचार करा. आपल्या बलस्थानांवर भर द्या. त्यांच्यायोगे तुम्ही उणिवांवर मात करू शकता. भांडवल नसले तरी कष्ट करायची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो’… 

असे विचार मांडणारे यशस्वी उद्योजक राजन पंदारे  यांचा जन्म ६ ऑगस्ट १९८१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील अतिदुर्गम आंजिवडे या छोट्याशा खेडेगावात झाला.  शिक्षणापेक्षा लवकर  घराला आर्थिक आधार देण्याची जास्त गरज होती. त्यामुळे राजन पंंदारे यांनी आपल्या आयुष्यात कधीच शिक्षणाला  महत्त्व दिले नाही. मॅट्रिकनंतर लगेचच ते कोल्हापूरमधील हॉटेल पंचशीलमध्ये कामाला लागले. तिथे सुरुवातीला त्यांना हॉटेलातील खरकटी भांडीही घासावी लागत…

त्यांनी मनाशी निश्चय केला, की ‘आज काय करतोय यापेक्षा मला भविष्यात काय करायचेय हे जास्त महत्त्वाचे आहे. भलेे मी गरीब म्हणून जन्माला आलो, पण मी गरीब म्हणून नक्‍कीच मरणार नाही. मी प्रचंड कष्ट करीन; पण माझी आर्थिक परिस्थिती सुधारेन आणि एक संपन्न आयुष्य जगेन. त्यासाठी मी आयुष्यात व्यवसायच करेन.’

त्या प्रतिज्ञेला अनुसरूनच त्यांनी पुढील आयुष्यात वाटचाल केली. हॉटेलात काम करीत त्यांनी रात्रशाळा करून एफवायबीए पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे शिक्षक व मित्र अ‍ॅड. रवी  रेडेकर यांच्या मदतीने व काही पैसे भरून एका बँकेत ते नोकरीला लागले. तिथे त्यांना कॉन्ट्रॅकट लेबर म्हणून काम करावे लागे. तेव्हा त्यांना पहिल्यांदाच लेबर कॉन्ट्रॅक्ट, आऊटसोर्सिंग या गोष्टींची माहिती झाली. 

कोल्हापुरात त्यांची प्रगती होत नव्हती. ते अस्वस्थ होते. पण त्यांच्या गुणांची, प्रामाणिकपणाची कदर करणारे लोकही होते. त्यातीलच त्यांचे एक स्नेही सिद्धार्थ गोलिकरे यांच्या ओळखीने ते पुण्याला आले. गोलिकरे यांनी एक लेबर सप्लाय कंपनी काढली होती. त्यात सुपरवायझर म्हणून ते जॉइन झाले. ही कंपनी लवकरच काही कारणांमुळे बंद पडली. दरम्यानच्या काळात राजन पंदारे यांना लेबर सप्लाय-आऊटसोर्सिंग-युटिलिटी सर्व्हिसेस या प्रकाराची सर्व माहिती झाली होती. काही कंपन्या-सोसायट्या-हॉस्पिटल्स आपले कामगार न ठेवता लेबर एजन्सीज्मार्फत कामे करवून घेतात. एजन्सी त्यांच्या कामाला आवश्यक कर्मचारी पुरवतात. कामगार जरी त्या कंपनीत काम करीत असले तरी ते एजन्सीचे कर्मचारी असतात. त्यांचा पीएफ, ईएसआयसी वगैरे त्या एजन्सीतर्फे बघितले जाते. यालाच आऊटसोर्सिंग असे म्हणतात.

पुण्यातली पहिली कंपनी बंद पडल्यावर २००८ साली राजन पंदारे यांनी सिद्धार्थ गोलिकरे यांच्या आर्थिक मदतीने स्वत:ची अमृता हाऊसकीपिंग सर्व्हिसेस नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीतर्फे ते सध्या पुण्यातील अनेक आयटी कंपनीज्, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् यांना युटिलिटी सर्व्हिसेस पुरवतात. ज्याप्रमाणे त्या कंपनीची गरज असेल त्याप्रमाणे अमृता हाऊसकीपिंग सर्व्हिसेसतर्फे स्टाफ पुरवला जातो. सध्या त्यांच्याकडे शेकडो कामगार आहेत. त्यांना निरनिराळ्या ठिकाणी त्या-त्या कंपन्यांची कामे करण्यासाठी पाठवले जाते. आऊटसोर्सिंगच्या पद्धतीनुसार या कामगारांना सर्व प्रकारचे कायदेशीर लाभ अमृता हाऊसकीपिंग सर्व्हिसेस पुरवते.

ही कंपनी स्थिर झाल्यावर राजन पंदारे यांनी आपल्या व्यवसायाचे एक्सपान्शन केले. त्यांनी आधी जंगली महाराज रोडवर हॉटेल हरिओम सुरू केले. नंतर नारायण पेठेत सरस्वती या त्यांच्या आईच्या नावे एक खानावळ सुरू केली. येथे राजन पंदारे यांनी कोकणी फूडवर जोर दिला आहे. पुण्यातील लोकांना अस्सल मालवणी जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. ही खानावळ सध्या जोरात चालू आहे.

याचेच पुढचे पाऊल म्हणून त्यांनी २०१८ साली माऊली विवाहसंस्था प्रा. लि. या मॅरेज ब्युरोची स्थापना केली. येथेही त्यांनी कोकणी लोकांना केंद्रबिंदू केले. कोकणी माणसांची लग्‍ने जमावीत म्हणून ही विवाहसंस्था काम करते. गेल्या दोन वर्षांत त्यांचे ५००० सभासद झाले आहेत. आजवर त्यांनी दीडशेपेक्षा जास्त विवाह जमवलेले आहेत. सावंतवाडीत त्यांचे हेड ऑफिस आहे, तर  मुंबई, रत्नागिरी व पुणे येथे त्यांची कार्यालये आहेत. भविष्यात २०२१ पर्यंत माऊली विवाह संस्थेच्या पूर्ण कोकणात १० शाखा उघडण्याचे त्यांचे ध्येय आहे.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *