उद्योग मोटिवेशनउद्योजकतास्टार्टअप Story

जंगलातील लाकूडतोड्या ते सर्वात मोठी फर्निचर कंपनी! वाचा IKEA चा भन्नाट प्रवास…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नवी मुंबईच्या तुर्भे भागात आयकिया नावाचं एक फर्निचर आऊटलेट सुरू झालं आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातुन लोक येऊन तिथे गर्दी करू लागले.

मॉलमध्ये फिरताना जसे फोटो इंस्टा आणि व्हाट्सअॅपच्या स्टोरीज अपलोड होतात, तसे आयकियाच्या या आऊटलेटचे फोटो भराभर अपडेट व्हायला लागले.


पिवळ्या रंगाच्या सिम्बॉलवाले हे आयकिया नेमकं आहे तरी काय?

अगदी फोल्डिंगच्या खुर्चीपासून ते किंग साईज बेडपर्यंत सगळ्या फर्निचरच्या गोष्टी एकाच जागेवर, एका वेळी मिळण्याचे ठिकाण म्हणजे आयकिया! जगातला सगळ्यात मोठा फर्निचरचा ब्रँड म्हणजे आयकिया…

भारतात हैद्राबादमध्ये पहिलं शोरूम सुरू केल्यानंतर एकूण ४० शोरूम पूर्ण भारतात पहिल्या टप्प्यात सुरू करण्याचे लक्ष्य आयकियाने ठेवले आहे.

नवी मुंबईत सुरू केलेल्या शो रूमच्या माध्यमातून आयकिया ही फर्निचर कंपनी महाराष्ट्रात उतरली.

जगप्रसिद्ध अशा याच आयकियाची स्थापना करणाऱ्या इंगवार कॅम्परड यांना आज आपण भेटणार आहोत.

आयकियाचे संस्थापक इंगवार हे स्वीडनचे नागरिक. १९२६ साली स्वीडनच्या समालँड भागातल्या अगुणेरीड गावात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये जन्माला आलेले इंगवार यांच्या गरिबीमुळे काटकसर करण्याच्या सवयीमुळेच आयकिया नावाचा ब्रँड उभा राहू शकला.


त्यांच्या बालपणी इंगवार होलसेल बाजारातून क्रेडिट बेसवर मोठ्या प्रमाणात माचीस विकत घेत असत. त्याकाळी वीज प्रत्येकाला परवडणारी नव्हती. म्हणून रोजच्या वापरातील माचीस इंगवार घरोघरी जाऊन विकत असत. मिळणाऱ्या पैशातून क्रेडिट क्लिअर करून इंगवार नफा कमवू लागले.

वयाच्या दहाव्या वर्षी इंगवार आपल्यासोबत बाजूच्या गावात सुद्धा जाऊन सामान विकायला लागले. या सामानात नंतर फक्त माचीस नव्हती. तर मासे, ख्रिसमस ट्री सजावटीचे साहित्य, बी-बियाणे, पेन, पेन्सिल या वस्तू सुद्धा दिसू लागल्या.

सामान सायकलवर चढवून, त्याची विक्री करण्यासाठी ते अनेक ठिकाणी फिरत. काम संपलं की माघारी येत असत. विशेष म्हणजे आपला अभ्यास आणि शिक्षण सुरू ठेवून ते हे सगळं करत होते..

इंगवार यांचे वडील लाकुडतोड करून घर चालवत असत. तंत्रज्ञान पुढारले नसल्याने लाकडाचा वापर तेव्हा मोठ्या प्रमाणात व्हायचा. लाकडाला असलेली मागणी आणि कमी होणारा पुरवठा पाहून इंगवारचे वडील आपल्यासोबत इंगवारला पण घेऊन जाऊ लागले.

त्यांच्यामते इंगवार करत असलेली मेहनत घर चालवायला पुरेशी नव्हती. तो ज्या वस्तू विकत आहे त्याऐवजी त्याने लाकडं विकली तर नफा भरपूर होऊ शकतो. वडिलांच्या सांगण्यानुसार इंगवार नियमित वडिलांसोबत लाकडं तोडून ती विकायला लागला.

वयाच्या १७ व्या वर्षी वडिलांनी जमा केलेली काही रक्कम इंगवारच्या हातात देऊन त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर जायला सांगितले.

वयाच्या ५ व्या वर्षांपासून बाजारात वस्तू विक्रीसाठी उतरलेल्या इंगवारला शिक्षणापेक्षा बिझनेसमध्ये जास्त रस निर्माण झाला होता. याच पैशातून त्यांच्या गावात त्यांनी एक छोटंसं दुकान सुरू केलं. ज्यामध्ये ते जंगलातील लाकडे विकत असत.

कालांतराने परिस्थिती सुधारल्यानंतर इंगवार यांनी आपल्या वडिलांना सुट्टी दिली. त्यांना निवृत्त व्हायला सांगून, स्वतः लाकडाचा व्यवसाय सांभाळू लागले.

कालांतराने गावकरी इंगवार यांचे लाकडाचे सप्लायर झाले, तर इंगवार त्या लाकडाचे रिटेलर बनले. इंगवार यांनी आपल्या दुकानाचे नाव ठेवले, आयकिया.! (IKEA)

आय आणि के त्यांच्या नावाचे इनिशीयल, इ त्या जंगलाचे नाव जिथे त्यांनी लाकुडतोड केली. तर ए त्यांच्या गावचे इनिशीयल.!

हळूहळू आयकिया लाकडं विकण्यासोबत त्याच लाकडापासून छोटंछोटं फर्निचर बनवायला लागली. वस्तू ठेवण्याचे छोटे टीपॉय, जेवणासाठीचे डायनिंग टेबल आयकिया मध्ये बनू लागले. लाकूड विकण्यामुळे झालेली ओळख आणि मार्केटमध्ये असलेल्या छबीमुळे आयकियाची उत्पादने हातोहात विकली जाऊ लागली.

व्यवसाय एवढा यशस्वी झाला होता की १९५९ मध्ये आयकियामध्ये १०० पेक्षा जास्त कर्मचारी होते. आयकियाला ब्रेक थ्रू मिळाला १९६० मध्ये.!

स्वीडनमधल्या प्रसिद्ध हॉटेल चेनने आयकियाचे फर्निचर बुक केले. फर्निचरची क्वालिटी, वेळेवर झालेली डिलिव्हरी यामुळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आयकिया जबरदस्त प्रसिद्ध झाली.!

आयकिया आता स्वीडन पुरती मर्यादित न राहता आता तिला युरोपातून मागणी येऊ लागली. वाढलेल्या मागणीचा आवाका बघता आयकियाने १९६३ मध्ये नॉर्वे, १९६९ मध्ये डेन्मार्क आणि १९७३ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये आपले कारखाने आणि शाखा सुरू केल्या.

आज एकूण ४२ देशात आज आयकिया आपलं अस्तित्व निर्माण करण्यास यशस्वी झाली आहे. इंगवार १९७६ पासून स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले.

Marathi Udyojak

मराठी उद्योजक हा प्रत्येक मराठी उद्योजकासाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. मराठी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही व्यवसाय, शेअर मार्केट, स्टार्टअप इत्यादी विषयी उपयुक्त माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहचवत असतो.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *